भवानीप्रसाद मिश्र - ‘ सूर्य हा पृथ्वीचा पहिला...
अनुवादित
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
‘ सूर्य हा पृथ्वीचा पहिला प्रियकर आहे, ’
असं *एडिथ सिट्वेलनं म्हटलं होतं
सूर्याच्या नंतर आणि कदाचित
त्याच्या आधीसुद्धा
पृथ्वीचे तसे अनेक चाहते होते !
पृथ्वीविषयीचं आपलं प्रेम
कितीतरी जणांनी
वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त केलं...
काहीजण तर तिचं
‘ वातावरण ’च बनून गेले
तर काहीजण सामावून गेले
तिच्या आत...
काहीजण राहिले तिच्या पुढ्यात...
विसावले तिच्या कुशीत...
मात्र, एडिथनं
यापैकी कुणाचंही नाव घेतलं नाही...
माझ्या मते, योग्यच केलं एडिथनं !
पृथ्वीला असं अनेकांनी प्रेम दिलं...
मात्र, पृथ्वीवर प्रेम केलं
सगळ्यात पहिल्यांदा ते सूर्यानंच !
प्रियकराच्या मनात
प्रियतमेहून स्व - तंत्र अशी
एक आस असते
एक अस्वस्थता असते
एक आग असते
पृथ्वीविषयी सूर्याच्या मनात
जशी आस आणि आग आहे
तशी अन्य कुणाच्याही मनात नाही !
पृथ्वीतशी सगळ्यांनच आवडते
वेगवेगळ्या प्रकारे
तिची मर्जी सांभाळतात
सगळेच इमाने - इतबारे
मात्र, प्रियकरामध्ये
एक प्रकारचा स्वार्थसुद्धा असतो...
तो मला सूर्यामध्ये दिसतो !
कितीतरी डोंगर उल्लंघून
तो रोज येतो
पृथ्वीच्या दारी
आणि तिष्ठत - ताटकळत राहतो
दहा - दहा, बारा - बारा तास !
मात्र, ती त्याला
माघारी धाडते संध्याकाळी...
कदाचित वाटत असावी तिला लाज...
संकोचत असावी ती...
आणि सूर्यही निघून जातो चुपचाप
आणि जाताना टाकून जातो
पृथ्वीच्या पदरात
असंख्य तारे...
तिच्याकडून त्याची
एवढी मोठी उपेक्षा होऊनही !
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP