प्रा. ज्योती जोशी - सगळी झाकपाक आवरून निवांत ...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
सगळी झाकपाक आवरून
निवांत बसतान जाणवलं...
आज कशी कडाडून भूक लागलीय...
काय करावं बरं...?
धडपडून उठत तिनं
सगळे डबे चाचपून पाहिले
पण बहुतेक सगळे रिकामेच !
नाही म्हणायला शेवटच्या एका डब्यात
थोडं दु:ख शिल्लक होतं
‘ असावं गाठीला ’ म्हणून तिनंच ते
अडीनडीसाठी कधीकाळी काढून ठेवलेलं...
न राहवून सरतेशेवटी तिनं
तेच मळायला घेतलं
डोळ्यांवाटे वाहणार्या खारट पाण्यात
चांगलं तिंबून भिजत ठेवलं
त्यातच थोड्या बोथट झालेल्या रागाचं
तिखट कालवून झणझणीत केलं
वाटीचं साचेबंद माप घेऊन
दु:खाची पुरी तयार झाली !
चांगलीच फ़ुगून वर आली...
घरात नुसता घमघमाट सुटला
पटकन् ताट घेत
तिनं दु:ख पानात वाढून घेतलं
‘ दु:खाला बाकी तोंडीलावणं कशाला ? ’
म्हणत हळूच एक तुकडा तोडून तोंडात
तिच्या मनात आलं :
‘ अडीनडीला दु:खसुद्धा
असं बाजूला काढून
ठेवणं बरं असतं.
पोटंच काय : पण रिकामं मनसुद्धा
कसं गच्च भरतं...
...आणि भरून वर पुन्हा उरतंही ! ’
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP