रवी कोरडे - तू दिसू लागतोस अवतीभोवती ...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
तू दिसू लागतोस अवतीभोवती
हिरव्या रंगातून
तेव्हा श्वासांनाही
येणार्या सुगीची चाहूल लागते
काडी - काडी जमवून जो खोपा उभा केला
त्यावर सुखाची सावली पडते
बियाण्यांच्या पिशव्या
ज्या तर खरं दप्तर झाल्यायेत
प्रत्येक हंगामात पाठ बदलणार्या
त्यांचा गंध लागतो
पाठ्यपुस्तकातल्या कवितेच्या पानाला
आणि खिडकीतून
आभाळ मायाळू झाल्याचा भास होतो
ओढ्याच्या ओल्या मातीत
शाळा चुकवून आलेल्या
मुलांची रोपं उभी राहतात ओळीनं
एक म्हैस उभी राहते पाण्यात
कसलीतरी अनामिक निश्चिंतता रवंथ करीत
की जिच्या पाठीवर एक बगळा निवांत
तिच्याच शरीराचा भाग बनून
लालसर गुलाबी मऊ गादीसारखा किडा
ओल्या नक्षत्राची सोबत घेऊन येतो
आणि होऊन जातो सवंगडी काडेपेटीतला
एक घागर
जिनं काठोकाठ भरण्याचं स्वप्न पाहिलं
तिला दिसू लागते
बांवड्यांची हिरवी नक्षी सभोवार
तू पुसून टाकतोस झाडाच्या फांद्यांना
लटकणार्य़ा सावल्यांचं दृश्य
एका क्षणात
शहरातल्या एक्कलकोंड्या खोलीत
तू पुरवतोस रसद
स्वप्न शाबूद ठेवण्यास
आणि जेव्हा तू उतरतोस
हातांच्या तळव्यांवर नेमाने
तेव्हा एक शक्यता निर्माण करतोस
चिमुकल्यांच्या पायांना
मिरगाची ओली माती चिकटण्याची
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP