शरद कवडे - सुकलेलं गवत खुरपून काढावं...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
सुकलेलं गवत खुरपून काढावं
मुंग्यांची घरं, कुत्र्यांनी केलेली डबरी मुजवून घ्यावीत
पन्हाळ्या मोकळ्या कराव्यात पावसाळ्याआधी
म्हणजे साठत नाही पाणी माळवदावर
एवढं करूनही पहिल्या पावसाळ्यानंतर
भिंती ओलसर पाझरायच्या
खांडा-किलचनातून ठिबकायचं पाणी
बादल्या-घमेली, चरव्या-पातेली ठेवूनही
जमीन पोपडे धरायची
आता
आई नाही...
घरचं माळवदही राहेलं नाही
पाऊसही पहिल्यासारखा लागून रहात नाही
तरीही
आषाढात, पहिल्या पावसाआधी,
डोळे पाझरू लागतात
अश्रू ठिबकू लागतात
गळणार्या मनाखाली कुठली भांडी ठेऊ आई ?
N/A
References : N/A
Last Updated : December 04, 2017
TOP