राजेंद्र उगले - पोपडे पडून गेलेल्या भिंती...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
पोपडे पडून गेलेल्या भिंतीला
आई करायची गिलावा
आणि भिंती सज्ज व्हायच्या
ऊन्ह, पाऊस, वारा झेलण्यासाठी...
त्या होत असत भरभक्कम आधार
फाटक्या संसाराचा भार पेलताना
आणि सारवलेली भुईही
आनंदानं नाचू द्यायची घरभर...
याच भिंतींनी
भरलं पाखरांच्या पंखांत
उडण्याचं बळ
आणि पाखरं उडून गेलीत
आईच्या सुसंस्कारित घरातून
वेशीबाहेरच्या दुसर्या जगात
त्यांनी उभारलंय आता
स्वतःचं भरभक्कम घर
ज्याच्या भिंतींना
ना गिलाव्याची ओल
ना सारवण्याचा वास !
इथल्या मऊ फरशीवर
साचून आहेत
आईच्या डोळ्यातून सांडलेले अश्रू
ज्यावरून घसरतोय सारखा पाखरांचा पाय
आणि भिंती तर
अंगभर रंग माखूनही
भासताहेत भकास स्मशानासारख्या...
आईच्या घराच्या भिंतींना
असायचं हमखास एकतरी खातं
ज्यातून मिणमिणायचा रात्रभर दिवा
आणि घर निघायचं उजळून !
आमच्या पडदासंस्कृतीतून
या खात्यासह
गायब झालंय का आई नावाचंही खातं ?
N/A
References : N/A
Last Updated : March 09, 2017
TOP