डॉ. मेघना हणमसागर - एकटे देऊळ पडके उभे वैराण ...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
एकटे देऊळ पडके
उभे वैराण उंचावरी
पांथस्थ कुणी न ये
फिरकावया तिथवरी
कळसाचा रंग विटका
जराजर्जर पायर्या
तडकल्या भिंती सार्या
सभामंडपाची गेली रया
घंटा जागीच निःस्तब्ध
भव्य खांबही जीर्णसे
छतावरील नक्षीही
फिकट, उदास भासे
तृण-वल्ली माजलेल्या
कमानी-गवाक्षांवरी
शेवाळल्या अंधारात
घुसमटे गाभारी
जुने राजस ऐश्वर्य
राऊळाने भोगलेले
आज त्यातले काहीच
नाही काहीच उरले
फांद्या हिरव्या डोकावती
तेवढीच सजीवता!
काया मूर्तीची चकाके
कधी वीज लकाकता
कुणी चुकलेला जीव
येई...ठेवी फुले पुढ्यात
’दाव दिशा’ म्हणे देवा,
’जगलो मी तिमिरात...’
नश्वर जगाचा पसारा
चालवतो तो ईश्वर
तोच शाश्वत् चराचरी
आहे भक्तांच्या खातर !
N/A
References : N/A
Last Updated : March 04, 2018
TOP