वेणू कुर्जेकर - एका संदुकीत ठेवली आहेत तु...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
एका संदुकीत ठेवली आहेत
तुझी झबली-टोपडी, लाळेरं, गोंड्याची टोपी
चिमुकले स्वेटर अन् इवलाले मोजे
पावडरचा, दुधाचा, गुटीचा, तेलाचा
असा संमिश्र गंध येतो त्या सगळ्याला
अन् हरवून जाते मी त्या स्वर्गीय सुगंधात....
तुझी ‘बालभारती‘ ची पुस्तकं
पुस्तकातलं जाळीचं पान
मोरपीस, फुलांच्या पाकळ्या
जपून ठेवलेल्या निबंधाच्या वह्या
तुझं किंचीत तिरप्या वळणाचं अक्षर....
ते अक्षरच संवाद साधतं माझ्याशी
अन् हरवून जाते मी त्या निळ्या अक्षरसागरात....
तुझ्या बालपणीचा मऊ-मुलायम स्पर्श
तुझं बाळमुठी चोखणं
रडणं, झोपेत खुदकन् हसणं, रांगणं, पळणं
तुझं वाढतं वय, फुटलेला आवाज, कोवळी मिसरूड
तुझी ताडमाड उंची
सगळं सगळं जपून ठेवलंय मी हृदयाच्या संदुकीत
तुझा दिगंताचा प्रवास
अन् माझं पोरकेपण
सैरभैर मनात आठवांचं वादळ
हरवून जाते मी त्या वादळात....
अन् मूक आसवांत....
N/A
References : N/A
Last Updated : March 04, 2018
TOP