सुभाष पाचारणे - बयो, शुक्रवारच्या आठवडी ब...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
बयो,
शुक्रवारच्या आठवडी बाजारात
काल तू भेटलीस
डाव्या हातात बाजाराची पिशवी
आणि उजव्या हातानं कडेवरचं पोरगं सांभाळत
खुदकन् हासत विचारलंस
‘ ओळखलंस का ? ’
ओळखीच्या नजरेनं मी पाहिलं तुझ्याकडं
गोर्या त्वचेवर करपलेला काळ रंग
डोक्यावर झालेलं केसांचं भुस्कट
डोळ्यांमध्ये ओळखीचा दिवा पेटत गेला
आणि मी पाहत राहिलो तुझ्याकडं
तुझ्या डोळ्यांतून विझत चाललेल्या जिंदगानीकडं
तू बोलत राहिलीस
तुझ्याबद्दल
तुझ्या संसारबद्दल
तुझ्या कपाळी आलेल्या वैधव्याबद्दल
आणि अभागी भावजयीला
वडीलकीच्या नात्यानं
आधार द्यायचा सोडून
अत्याचार करू पाहणार्या
दिराबद्दल...
आणि एवढं सगळं सोसूनही
न विझलेल्या जगण्याच्या जिद्दीबद्दल...
तू बोलत राहिलीस...
आणि मी मात्र आठवत गेलो
चौथीच्या वर्गात भेटलेल्या
लांबसडक केसांच्या मुलीला
खळीमध्ये हरवलेल्या गोर्या
गोर्या गालांच्या
आणि पांढरा पांढरा
फ्रॉक घालून
सगळ्या वर्गभर
नाचणार्या
गुलाबी
परीला !
N/A
References : N/A
Last Updated : August 05, 2017
TOP