मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नव कवी|
नेहमीपेक्षा ती सकाळी लौकर...

सतीश सोळांकूरकर - नेहमीपेक्षा ती सकाळी लौकर...

एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.


नेहमीपेक्षा ती सकाळी लौकर उठेल
खूप वेळ आंघोळ करत राहील
केस तसेच ओले ठेवून
सावकाशीनं चहाचा एकेक घोट घेत राहील
खिडकीच्या काचेवर दव साचलं असावं, असं म्हणून
पदरानं खिडकीची काच पुसत राहील

निगुतीनं आवरेल स्वयंपाकघर
डबे भरून ठेवेल मुलांचे, नवर्‍याचे
त्यांची पुस्तकं, बूट
घरभर अस्ताच्यस्त पसरलेले कपडे
आचरून ठेवेल नीट

चहा-नाष्टा तयार ठेवेल
सर्वांचा आवडीचा

पूजा उरकून घेईल

मुलं, नवरा उठेपर्यंत
त्यांचं आवरेपर्यंत
अजून एकदा चहा घेईल
पेपरवरून उभ्या नजर फ़िरवेल
टीव्ही लावेल... बंद करेल लगेच

मोबाईल घेईल हातात
कुणाचा तरी मेसेज यावा
कुणाशी तरी बोलत राहावं, असं वाटेल तिला
पण ठेवून देईल ती मोबाईल तसाच
घरामध्ये जिथं नेटवर्क मिळत नाही त्या टेबलवर
चूकून ठेवल्यासारख्या

चांगली साडी नेसेल
नवर्‍याला जबरदस्तीनं घेऊन जाईल स्टेशनपर्यंत
वाटेत थांबून गजरा घेईल हट्टानं
तशीच माळेल ती गाडीवर बसता बसता

दिवसभर भिरभिरत राहील
या फ़ायलीमधून त्या फ़ायलीमध्ये
जराही उसंत न घेता

चहाच्या टेबलवर तो भेटेल तिला
विचारेल : ’आज काय झालं परत ? काय बिनसलं ?
अशी उदास का ?’
ती काही बोलणार नाही
चहाचा एकेक घोट सावकाश घेत राहील
त्याची नजर चुकवत राहील

संध्याकाळची उदास वाट
तिला पुन्हा घराकडं ढकलत नेईल
वाट चुकलेला एक ढग मात्र
खिडकीपाशी कोसळत राहील...

N/A

References :
९३२४३६३९३४
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP